एकीकडे आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आजही अनेक भागांत महिलांचे अनेक प्रश्न कायम आहेत. पुरुषसत्ताक पद्धतीत मिळणारा दुजाभाव, पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या स्थलांतराच्या ठिकाणी होणारी उपेक्षा, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे महिलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरित आहेत.
शातील सामाजिक संरचनेचा सारासार विचार केल्यास, ग्रामीण भागात पुरुषांच्या तुलनेत महिलांना आजही समान न्याय व हक्क मिळत असल्याचे दिसत नाही. संसाराचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी करावे लागणारे वारेमाप कष्ट, पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, प्रसंगी घरच्याच शेतात मजुराप्रमाणे करावे लागणारे काम तसेच संपत्तीच्या वारसा हक्कात न मिळणारा वाटा याबाबत महिलांनाच सर्वाधिक तोंड द्यावे लागते. पुरुषसत्ताक पद्धतीमुळे घरकामातील असमानतेचा फटका महिलांना आजही सहन करावा लागतो. एकंदरीत या सर्वांचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर विशेषतः प्रजनन क्षमतेवरच होत असल्याचे दिसते. ‘ट्रान्सफॉर्म रुरल इंडिया’ने उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या पाहणीनुसार, ग्रामीण भागातील अनेक महिलांमध्ये गर्भाशय बाहेर येणे, पांढरा स्त्राव जाणे, गर्भाशयात संसर्ग होणे असे गंभीर आजार दिसतात. त्याशिवाय संस्थात्मक प्रसूती तसेच दर्जेदार प्रसुतीविषयक आरोग्य व्यवस्थेच्या अपुऱ्या सुविधेचा अभावही ग्रामीण भागात असल्याचे निदर्शनास आले.